नवी दिल्ली : देशभरातील सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतसक्ती केल्याच्या निर्णयानंतर दोनच दिवसात सुप्रीम कोर्टाने अनोखा निर्णय दिला आहे. सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रगीत लावणं सक्तीचं करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे एका वकिलानेच ही याचिका दाखल केली होती. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिकेवर सुनावणीची गरज नसल्याचं सांगितलं.

सर्व चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत सक्तीचं करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असंही सांगण्यात आलं आहे. याआधी केवळ महाराष्ट्रातच चित्रपटाआधी राष्ट्रगीत अनिवार्य होतं, मात्र आता देशभरातील सर्वच थिएटरमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक असेल.

इतकंच नाही तर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहणंही गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तसंच कोणत्याही परिस्थिती अपूर्ण राष्ट्रगीत लावण्यास परवानगी नसेल, असंही न्यायालयाने नमूद केलं.

केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्देश सर्व राज्यांना द्यावेत, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. शिवाय व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच वापर करु नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :


चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा : सर्वोच्च न्यायालय