पुणे: नथुराम गोडसे हा शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. सात्यकी सावरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.


सात्यकी यांच्या या दाव्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या गांधी हत्येमागे संघाचाच हात  आहे, या दाव्याला पाठबळ मिळालं आहे.

नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आलं नाही, किंवा त्याने कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही, असं सात्यकी यांनी म्हटलं आहे. संघाशी एकनिष्ठा दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचं काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे.

मात्र, नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्यानं संघाकडून केला जातो हे अतिशय क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाहची जबाबदारी सांभाळली, असा दावा सात्यकी यांनी केला. गांधी हत्येचं समर्थन न केल्याचं आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संघावर टीकाही केली आहे.