गुजरातमध्ये आचारसंहितेपूर्वी 12 दिवसांत मोदींच्या 12 घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2017 11:42 AM (IST)
जर हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा 12 तारखेला झाली, तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास 13 दिवसांचा विलंब का केला, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच बुधवार 25 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र त्यापूर्वीच गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 घोषणांचा पाऊस पाडला आहे. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे, तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान 9 नोव्हेंबरला होणार असून निकाल गुजरातसोबतच 18 डिसेंबरला लागणार आहेत. त्यामुळे जर हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा 12 तारखेला झाली, तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास 13 दिवसांचा विलंब का केला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये काही प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन घेतलं. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीचा कालावधी वापरण्यासाठी गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं लांबवल्याचा आरोप होत आहे.