PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार सबरिना सिद्दिकी यांना करण्यात येणाऱ्या ऑनलाईन ट्रोलिंगवरुन आता व्हाईट हाऊसने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. पत्रकारांना ट्रोल करणं हे निषेधार्ह आहे असं अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं आहे. पत्रकारांना ट्रोल करणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो असंही व्हाईट हाऊसने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल (Wall Street Journal) या वृत्तपत्राच्या पत्रकार सबरिना सिद्दिकी (Sabrina Siddiqui) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर मोदी समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांना भारतातील अल्पसंख्यांकांसोबत होणाऱ्या भेदभावावर वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरिना सिद्दिकी यांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर सबरिना सिद्दिकी यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. 


या घटनेबाबत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, एखाद्या अमेरिकन पत्रकाराला अशा प्रकारे करण्यात येणारं ट्रोलिंग हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पत्रकाराचा हा एक प्रकारचा छळ आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती.


वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरिना सिद्दिकी यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न करत म्हणाल्या की, भारत स्वत:ला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानतो, पण तुमच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांशी भेदभाव केला आहे आणि तुमच्यावर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. असे अनेक मानवाधिकार गट आहे ज्यांच्यावर बंदी आणली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या देशातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे अधिकार सुधारण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सरकार कोणती पावले उचलण्यास तयार आहात?


पत्रकाराच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींचे उत्तर 


पंतप्रधान मोदींनी त्यांना विचारलेल्या या प्रश्नावर आश्चर्य व्यक्त केले आणि ते म्हणाले, 'भारताच्या लोकशाही मूल्यांमध्ये भेदभाव केला जात नाही. जात, पंथ, लिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक स्थानाच्या आधारावर नाही. खरं तर भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. लोकशाही हा आपला आत्मा आहे. 


ही बातमी वाचा: