नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राष्ट्राला उद्देशून संबोधन करणार आहेत. यावेळी त्यांनी मुहूर्त निवडलाय तो 31 डिसेंबरचा. त्यामुळे नोटाबंदीची डेडलाईन संपत असताना आणि नवीन वर्ष संपत असताना पंतप्रधान नेमकं काय बोलणार याबद्दलचा सस्पेन्स वाढला आहे.


वेळ 31 डिसेंबरची आहे, हा दिवस खरंतर नव्या वर्षाच्या स्वागताचा, जल्लोषाचा. पण यावर्षीचं चित्र मात्र वेगळं असेल. कारण या दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा राष्ट्राला संबोधून भाषण करणार आहेत. 8 नोव्हेंबरला ते बोलले आणि सगळ्या देशाची चलनव्यवस्था उलथीपालथी झाली. आता ते पुन्हा  बोलणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याची उत्कंठा शिगेला पोहचलीय.

खरंतर नोटबंदीनंतर बोलताना 50 दिवसांची मुदत मोदींनी मागितली होती. पण 50 दिवसानंतर काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बँका, एटीएमच्या रांगा अजूनही कायम आहेत.शिवाय नव्या नोटा आल्यामुळे काळा पैसा खरंच थांबला का, दहशतवादाला आळा बसला का याचंही उत्तर त्यांना देशाला द्यावं लागणार आहे.

मोदी पुन्हा एकदा काळ्या पैशावर धडक कारवाईची नवी योजना काढणार का, याचीही कुजबूज सुरु आहे. सोशल मीडियावर तर त्यावरुन अनेक जोकही सुरु झालेत.

नोटबंदीचा त्रास तर अनेक सामान्यांनाही झाला, पण त्याबदल्यात खरंच काळ्या पैशाला आळा बसलाय का हे सरकारला दाखवून द्यावं लागणार आहे. त्यामुळे  मोदींचं भाषण हे केवळ मागच्या वर्षाचा आढावा घेणारं असणार की 2017 चे काही नवे संकल्प सांगणारं असणार याची चर्चा रंगू लागली आहे.