PM Narendra Modi Speech On No Confidence Motion : विरोधकांनी गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधीही अविश्वास प्रस्ताव आणला होता, पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांवर अविश्वास दाखवला आणि भाजप-एनडीए अधिक जागा घेऊन सत्तेत आले, त्यामुळे यावेळीही हा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून 2024 सालच्या निवडणुकीत आम्ही नव्या विक्रमासह निवडून येणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हा सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव नसून विरोधकांची परीक्षा आहे असंही ते म्हणाले. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावर ते बोलत होते. 


काय म्हणाले नरेंद्र मोदी? 


आतापर्यंत अनेकदा लोकांना विश्वास व्यक्त केला, त्यांचे आभार मानतो. देव दयाळू आहे, तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करतो. विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. गेल्या वेळी म्हणजे 2018 साली देखील विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. जनतेनेही विरोधकांवर विश्वास दाखवला नाही. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा आम्हाला एक प्रकारचा लाभ असतो. येणाऱ्या निवडणुकीतही एनडीए नवा रेकॉर्ड करून सत्तेत येणार यात शंका नाही. 


गेल्या तीन दिवसांपासून या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले मत मांडले आहे., विरोधकांनी मात्र याचं गांभीर्य पाळलं नाही. विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना लोकांपेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता आहे. विरोधकांना जनतेच्या भूकेची चिंता नाही, त्यांच्या राजकारणाची चिंता आहे. 


मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन द्यावं अशी मागणी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. पण भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर या आधी निवेदन दिलं होतं, पण विरोधकांना पंतप्रधानांकडून याचं उत्तर हवं होतं. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. 


अधीर रंजन चौधरी यांचा काँग्रेसकडून अपमान


ज्यांचे स्वतःचे वहीखाते बिघडलेले आहे, ते आमच्याकडून हिशोब मागत आहेत. अविश्वास प्रस्तावासाठी पाच वर्षे दिले तरी विरोधकांची पूर्ण तयारी नाही. अटल बिहारी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यानतंर शरद पवारांनी भाषण दिलं, 2004 सालच्या अविश्वास प्रस्तावावेळी सोनिया गांधी यांनी भाषण दिलं. 2018 साली मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण दिलं. पण यावेळी सर्वात मोठ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन यांना भाषण करु दिलं नाही, त्यांचं नावच या यादीत नाही. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून व्हिप


संसदेतल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप बजावला आहे. एकीकडे शरद पवार गटाकडून खासदारांना व्हिप बजावला असून दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही व्हिप बजावला आहे. लोकसभेत राष्ट्रवादीचे चार खासदार असून ते दोन खासदार शरद पवारांच्या गटाकडे तर दोन अजित पवारांच्या गटाकडे आहेत.  



ही बातमी वाचा: