नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर असलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कोम टर्नबुल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकूण सहा करारांवर स्वाक्षरी केली. या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि मॅक्लम टर्नबुल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधलं. यावेळी नरेंद्र मोदींनी टर्नबुल यांना विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचं उदाहरण दिलं.

नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यामधील तणाव वाढला होता.

नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना म्हणाले की, "मागील महिन्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आपण रोमांच पाहिला. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील भाषणात मी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांचा उल्लेख केला होता. आज भारतात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियात स्मिथ युवा क्रिकेट संघाला आकार देत आहे."

"मला आशा आहे की, तुमचा हा भारत दौरा स्मिथची फलंदाजी आणि इतर कर्णधारांप्रमाणे फलदायी ठरेल," असं मोदी पंतप्रधान मॅक्लम टर्नबुल यांना म्हणाले.

मॅल्कोम टर्नबुल यांचं रविवारी चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आज सकाळी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत झालं. या दौऱ्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध आणखी बळकट होती, अशी अपेक्षा आहे. टर्नबुल म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या मार्गावर या उत्कृष्ट देशाचं नेतृत्त्व करत आहे. भारताची कामगिरी जगासाठी उदाहरण आहे. भारतासोबत एकत्र येऊन आम्हाला आणखी चांगलं काम करायचं आहे."