भोपाळः मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत भारतीय सैन्यांचं कौतुक केलं. सैन्य बोलत नाही पराक्रम करतं, त्याप्रमाणे आपले संरक्षण मंत्रीपण बोलत नाहीत, असं सांगत अप्रत्यक्षपणे मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत कौतुक केलं.

भोपाळमधील शौर्य स्मारकाच्या उद्घाटनानंतर मोदी बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण देखील उपस्थित होते. मोदी झोपले आहेत, काही करत नाहीत अशी टीका होत होती, असं सांगत मोदींनी विरोधकांनाही धारेवर धरलं.

श्रीनगरमध्ये पूरग्रस्तांना मदत करताना जवानांनी कधीच माणुसकी सोडली नाही, असं सांगत मोदींनी जवानांचं कौतुक केलं. अनेक देशांकडे आपल्यापेक्षा जास्त सैन्यशक्ती असेल, पण सामान्य नागरिकांशी वागणूक, शिस्त यामध्ये आपले जवान पहिल्या क्रमांकावर असल्याचं मोदींनी सांगितलं.