सूरत : आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला बलात्कारप्रकरणी सूरत सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे. न्यायाधीश पीएस गढवी यांनी याप्रकरणी निकाल दिला. नारायण साईला एक लाखाचा दंडही न्यायालयाने ठोठवला आहे. नारायण साईला न्यायालयाने 26 एप्रिलला दोषी ठरवले.


सूरतमधील जहांगीरपुरा आश्रमातील महिला भक्तांचा बलात्कार केल्याचा नारायण साईवर आरोप आहेत. याशिवाय पीडित महिला भक्तांना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 6 ऑक्टोबर 2013 मध्ये पीडित महिलेने याबाबत सूरतमध्ये तक्रार दाखल केली होती.


2013 मध्ये आसाराम बापूच्या अटकेनंतर सूरतच्या दोन बहिणींनी पोलिसात तक्रार दाखल करत, आसाराम बापू आणि नारायण साईं यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. दोघींपैकी एक बहीण अहमदाबादमधील आश्रमात राहत होती. आसाराम बापूने तिच्यावर 1997 ते 2006 पर्यंत सातत्याने बलात्कार केला. तर दुसरी महिला सूरत येथील आश्रमात 2002 ते 2005 दरम्यान होती, तेथे नारायण साईने तिचं लैंगिक शोषण केलं.


याप्रकरणी एकूण 11 संशयितांना अटक करण्यात आली होती, मात्र सहा जणांची न्यायालयाने सुटका केली. नारायणच्या तीन महिला सहकाऱ्यांसह चौघांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. नारायण साई सध्या लाजपोरमधील जेलमध्ये कैद आहे.