नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. राहुल गांधी आणि नारायण राणे यांच्यात 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली.
विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडने नारायण राणे यांना तातडीने दिल्लीत बोलावले होते. त्यामुळे या भेटीबद्दल राजकीयदृष्ट्या महत्त्व अधिक वाढलं होतं.
2019 च्या निवडणुकीसाठीचा रोडमॅप काय असावा, यावर राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. शिवाय, पक्षांतराच्या चर्चेवर विचारल्यावर राणे म्हणाले, मी युतीचा मुख्यमंत्री राहिलो असल्याने सगळ्यांशी चांगले संबंध आहेत.
माजी खासदार निलेश राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांबद्दल जाहीर वक्तव्य केल्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी अशोक चव्हाणांनी हायकमांडकडे केली होती. शिवाय, राणेंबद्दलच्या अनेक तक्रारी वाढल्यानं त्यांच्या विरोधात ज्येष्ठ नेत्यांनी हायकमांडकडे बोलावं, अशीही तयारी सुरु होती. या सर्व पार्श्वभूमीवर राणेंनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींशी चर्चा केल्यानं भेटीचं महत्त्वं वाढलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेणं असो वा ‘मी युतीचा मुख्यमंत्री राहिलो असल्याने सगळ्यांशी चांगले संबंध आहेत’, अशी राणेंची प्रतिक्रिया येणं असो, या सर्व गोष्टींवरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.