Odisha Minister Naba Das Death : ओडिशाचे (Odisha) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री (Odisha health and family welfare minister) आणि  बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठ नेते नबा दास (Biju Janata Dal (BJD) leader Naba Das) यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या  एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते.  60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दासने त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला होता.

  


कोण होते नबा किशोर दास 


नब किशोर दास यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ओडिशातील झारसागुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिक केली.


सध्या ते बिजू जनता दलमध्ये होते. ते नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळातील ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते. 


नब किशोर दास हे आणखी काही कारणांमुळं चर्चेत आले होते. 2015 मध्ये ओडिशाच्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान पॉर्न फिल्म पाहताना त्यांना पकडलं गेलं होतं.  या घटनेनंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांना याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आठवडाभरासाठी निलंबित केले होते. मात्र, नब किशोर दास यांनी सांगितले होते की, त्यांनी कधीही पॉर्न फिल्म पाहिली नव्हती. इंटरनेट वापरताना चुकून ते सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले होते. 


शिंगणापूरमध्ये एक कोटी रुपयांचा सोन्याचांदीचा कलश दान


मंत्री नबा किशोर दास यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील शनी मंदिर ट्रस्टला एक कोटी रुपयांचा सोन्याचा आणि चांदीचा कलश दान केला होता.  दास यांनी दान केलेलं कलश हे शनी मंदिराला दिलेले आतापर्यंतचे सर्वात महागडे दान असल्याचं बोललं जात आहे. 


मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केलं दुःख


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री नाबा दास यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले आहे. नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे की, नबा दास हे सरकार आणि पक्षासाठी खूप महत्वाचे होते. त्यांच्या निधनाने ओडिशा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.