Rajnath Singh On Indian Ship Drone Attack : एमव्ही केम प्लुटो (MV Chem Pluto) या जहाजावर झालेला ड्रोन हल्ला आणि लाल सागरात (Red Sea) एमव्ही साईबाबा (MV Sai Baba) या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या सागरी हद्दीत नौकांवर हल्ले करणाऱ्यांना पाताळातही जाऊन शोधून काढू आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करू असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh ) यांनी दिला आहे. 


भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सध्या समुद्रात हालचाली वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक आणि युद्धशक्ती पाहून काही शक्तींना ईर्ष्या वाटत आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात केम प्लुटो या व्यापारी नौकेवर झालेला ड्रोनहल्ला आणि लाल समुद्रात साईबाबा या व्यापारी नौकेवर झालेल्या हल्ल्याची भारत सरकारने गांभीर्याने दखल घेतली असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले. 


त्यांनी पुढे म्हटले की,  भारतीय नौदलाने समुद्रातील देखरेख वाढवली आहे. ज्यांनी कोणीही हे हल्ले घडवले असतील त्यांचा पातळापर्यंत शोध घेतला जाईल आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मी देतो असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. 


आयएनएस इंफाळ नौदलाच्या ताफ्यात 


आज मुंबईत भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस इंफाळ ही विनाशिका युद्धनौका दाखल झाली. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह संबोधित करत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, नौदलाच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आता समुद्रात गस्त वाढवली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात समुद्री व्यापारात नवे स्थान गाठेल. तर, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितले की, व्यापारी जहाजांवर समुद्री चाच्यांचे हल्ले रोखण्यासाठी चार विनाशिका तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये पी-8आय विमान, डोर्नियर्स, सी गार्डियन, हेलिकॉप्टर आणि तटरक्षक जहाजे यांचा समावेश आहे. 


काय आहे प्रकरण?


शनिवारी (23 डिसेंबर) पोरबंदरपासून 217 सागरी मैल अंतरावर 21 भारतीय क्रू सदस्यांना घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने जहाजाला मदत करण्यासाठी अनेक जहाजे तैनात केली. दुपारी साडेतीनच्या सुमारास जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले. भारतीय तटरक्षक जहाज ICGS विक्रमने मुंबईला जाताना तिचे संरक्षण केले.


नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "जहाज पोहोचल्यानंतर, भारतीय नौदलाच्या स्फोटकविरोधी आयुध पथकाने हल्ल्याचा प्रकार आणि स्वरूपाचे प्राथमिक मूल्यांकन करण्यासाठी जहाजाची तपासणी केली." हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी आणि जहाजावरील ढिगाऱ्यांवरून हा ड्रोन हल्ला झाल्याचे दिसून आले. मात्र, हल्ल्याचा प्रकार आणि वापरलेल्या स्फोटकांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषण आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले. सध्या विविध यंत्रणांकडून संयुक्त तपास सुरू आहे.