गुवाहाटी : आसाममध्ये भाजप सत्तारुढ झाला असतानाच संघाच्या शाळेतील मुस्लीम विद्यार्थी राज्यात अव्वल ठरला आहे. आसाममध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सरफराज हुसैनने ही कामगिरी बजावली आहे.
सरफराज हा रा. स्व. संघाची शैक्षणिक संस्था असलेल्या विद्या भारतीचा विद्यार्थी आहे. सरफराजने राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेत एकूण 600 पैकी 590 गुण मिळवले आहेत. या यशाचं सर्व श्रेय सरफराज आपल्या शाळेतील शिक्षकांना देतो.
16 वर्षीय सरफराज हा गुवाहाटीच्या दक्षिण भागातील बेतकुचीच्या शंकरदेव शिशु निकेतनचा विद्यार्थी आहे. ही शाळा संघ परिवारामधील विद्या भारतीतर्फे चालवली जाते. सरफराजची इंजिनिअर होण्याची इच्छा आहे.
सरफराजने संस्कृतमध्ये निबंधलेखन स्पर्धा आणि वाद-विवाद स्पर्धांमध्येही नेहमी अव्वल क्रमांक पटकावला आहे. संस्कृतचे शिक्षण घेताना कधीही अडचण आली नसल्याचं तो सांगतो. "सरफराजला या शाळेत प्रवेश मिळवताना कोणतीही अडचण आली नाही. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे ही माझी कायमच इच्छा राहिलेली आहे, असं सरफराजचे वडिल अजमल हुसैन म्हणतात.
सरफराजच्या या कामगिरीवर खुश होऊन राज्याचे शिक्षणमंत्री हेमंत सरमा यांनी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्या भारतीची शाळा सुरु करणार असल्याचे जाहीर केले. तसेच सरफराजला पुढील शिक्षणासाठी 5 लाख रुपयांचं बक्षीसही दिलं आहे.
"राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा शाळा सुरु केल्याने विद्यार्थ्यांचा विकास होईल." अशी आशा सरमा यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात दहावीच्या परीक्षेला एकूण 3 लाख 81 हजार विद्यार्थी बसले होते. त्यातील एकूण 2 लाख 39 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 54 हजार 197 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.