वाराणसी :निवडणुका आल्या की मतदारांना प्रलोभनं दाखवावीच लागतात. मग त्यामध्ये अनेक आश्वासने जशी दिली जातात, तसं वेगवेगळ्या जाती घटकांविषयी विशेष ममत्वही मुद्दाम दाखवलं जातं. आजच्या निवडणुकीच्या राजकारणाचा हा एक अविभाज्य घटक बनलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही काल वाराणसीत एका दलित मतदाराच्या घरी जेवण करून उत्तरप्रदेशच्या दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अमित शाह यांच्या या कृतीवरून समाजवादी पार्टीने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.


 

 

अमित शाह यांच्या दलितांच्या घरी जेवणाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही अनेकांना आठवण झाली. यापूर्वी त्यांनीही विदर्भातील एका दलित कुटुंबाच्या घरी असंच जेवण केलं होतं. तर गेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक मजुरांसोबत श्रमदान केले होते.

 

 

आता भाजप अध्यक्ष आमित शाह यांनी देखील हाच कित्ता गिरवीत आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात काशीतील एका दलित कुटुंबाच्या घरी जाऊन जेवण केलं. यावर उत्तरप्रदेशचे राजकारण चांगलेच तापलं असून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शाह यांना लक्ष करीत त्यांनी ही कृती राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याचे म्हंटले आहे.

 

 

मुख्यमंत्री अखिलेश यादव पत्रकारांशी चर्चा करताना म्हणाले की, " या पूर्वीच्या निवडणुकीवेळी एक नेते बिसलरीची बॉटल घेऊन दलित कुटुंबाच्या घरी जेवायला गेले होते. पण त्यानंतर जाहीर झालेले निवडणुकीचे निकाल सर्वांनाच माहिती आहेत. तेव्हा आम्ही असा दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याचा ढोंगीपणा कधीच करीत नाही."