पणजी : गोव्यात पर्यटन हंगाम ऐन भरात असताना ड्रग्सचा काळा धंदा सुद्धा तेजीत आला आहे. उत्तर गोव्यातील किनारे ड्रग्स व्यवसायाच्या सावटाखाली असून पोलिसांच्या कारवाया सुरु असताना देखील त्याला लगाम बसताना दिसत नाही. हणजुणे येथे ड्रग्सची प्रयोगशाळाच चालवणाऱ्या विदेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्यानंतर तिथून जवळच असलेल्या कळंगुटमध्ये पोलिसांनी छापा टाकून मुंबईच्या तरुणाला ड्रग्स विक्री प्रकरणी गजाआड केले.


कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रीगन कुटो असं त्या तरुणाचे नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे.  30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.


पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाकडून 60 हजार रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. हा तरुण कळंगुट परिसरात ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजताच उपनिरीक्षक महेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. रीगन कुटो परिसरात दाखल होताच पोलिसांनी त्याला पकडले.


कुटोची झडती घेतली असता त्याच्याजवळ ड्रग्स सापडले. त्यामध्ये 30 हजार रुपये किंमतीचे चरस तसेच 30 हजार रुपये किंमतीचे एमडीएमके मिळून 60 हजार रुपये किंमतीचे ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहेत. उद्या, शनिवारी रीगनला रिमांडासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.