Mumbai Terror Attack 2008 : मुंबईवर झालेल्या 2008 सालच्या अतिरेकी हल्ल्याची किंमत दहशतवाद्यांना चुकवावी लागेल असा इशारा इस्त्रायच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी दिला आहे. अमीर ओहाना हे 31 मार्चपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे विश्वासू सहकारी अमीर ओहाना यांनी गेल्या वर्षी स्पीकर म्हणून पदभार स्वीकारला आणि 31 मार्चपासून ते चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी त्यांनी दहशतवादाबाबत मोठे वक्तव्य केले असून भारत आणि इस्रायल या दोघांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे.  दहशतवादाविरोधात आम्ही एकजुटीने लढू असंही ते म्हणाले. 


Mumbai Terror Attack 2008 : मुंबई हल्ल्याच्या आठवणी ताज्या


ओहाना म्हणाले की, 2008 मध्ये मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला आपल्या सर्वांना आठवतो. यामध्ये 207 हून अधिक लोकांची हत्या झाली होती. छाबडा हाऊसमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये इस्रायली आणि ज्यू देखील होते. हा केवळ भारतावरील हल्ला नसून ज्यू आणि त्यांच्या स्वातंत्र्यावरही हल्ला आहे. या हल्ल्याचा कट रचणाऱ्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल


India-Israel Relation: भारत-इस्रायल संबंध मजबूत 


इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना म्हणाले की, भारत आणि इस्रायल सोबत सर्व देशांना दहशतवादाविरोधात एकत्र यावे लागेल. भारत आणि इस्त्रायल या दोन देशांच्या दहशतवाद संबंधित समस्या या समान आहेत. या दोन देशांदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीमुळे आमचे नाते अधिक घट्ट होते. जेव्हा मला परदेशात जाण्याची पहिली संधी मिळाली तेव्हा मी भारताची निवड केली. भारत एक प्रमुख विकसनशील शक्ती आहे. आमच्यात बर्‍याच गोष्टी साम्य आहेत आणि आमच्या देशातील कोणीही वक्ता भारताला भेट दिला नव्हता. 


अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होतील


भारत दौऱ्यादरम्यान ओहाना त्यांचे समकक्ष ओम बिर्ला यांच्यासमवेत दोन्ही संसदांमधील सहकार्य करारावर स्वाक्षरी करतील. जेणेकरून दोन्ही संस्थांमधील ज्ञानाची देवाणघेवाण अधिक सुलभ करता येईल. त्यांच्यासोबत खासदार मायकल बिटन आणि इस्रायल-इंडिया इंटर-पार्लियामेंटरी फ्रेंडशिप ग्रुपचे अध्यक्ष अमित हालेवी असतील. इस्रायलचे हे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहे. ते मुंबईलाही भेट देतील, जेथे ते छाबडा हाऊस येथे दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करतील.


ही बातमी वाचा: