लखनऊ: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघा एक आठवडा बाकी असताना मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना त्यांच्याच पक्षानं सहा वर्षासाठी निलंबित केल्यानं आता एक मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत नेमकं कोण मुख्यमंत्री असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होऊ शकतात.

अखिलेश यादव यांच्या गटाकडून रामपाल यादव यांनी काल तातडीचं स्वतंत्र अधिवेशन बोलावलं होंत त्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज मुलायम सिंह यादव यांनी आज कठोर निर्णय घेत अखिलेश यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

अखिलेश यादव यांच्यावरील कारवाईनं मात्र एक घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. स्वत:च्या पक्षानंच स्वत:च्या मुख्यमंत्र्यांला हटवलं आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत आणि त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कोण असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत मुलायम सिंह यांनी म्हटलं आहे की, 'मुख्यमंत्री कोण असेल हे मी ठरवेल.' दुसरीकडे अनेक आमदार हे अखिलेशच्या बाजूने आहेत. जर अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर मुलायम सिंह यादव नवा मुख्यमंत्री नेमू शकतील. पण जर तसं झालं नाही तर दोघांना आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. जर कुणाचंही बहुमत सिद्ध झालं नाही तर मात्र, उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदासाठीचा एक वेगळा संघर्ष येथे पाहायला मिळणार आहे.