मुंबई : देशात लवकरच क्रिप्टोकरन्सी संदर्भात नवा कायदा अस्तित्वात आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारच्या क्रिप्टोकरन्सी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवर आपला विश्वास आहे आणि ते क्रिप्टोकरन्सीपासून वेगळं असल्याचं मुकेश अंबानी म्हणाले. इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (IFSCA) द्वारे आयोजित इन्फिनिटी फोरममधील मुलाखतीत ते बोलत होते. 


मुकेश अंबानी म्हणाले की, "भारत भविष्यासाठी पुढील धोरणे आणि नियम लागू करत आहे. माझा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे आणि ते क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळे आहे. भारतीय सोसायटीसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी खूप महत्वाचे आहे."


केंद्र सरकारने देशात क्रिप्टोकरन्सी विधेयक आणण्याची तयारी सुरु केली असताना मुकेश अंबानींनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर क्रिप्टोकरन्सीच्या प्रभावाबाबत रिझर्व्ह बँकेने आधीच सरकारला सतर्क केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे क्रिप्टोकरन्सीपेक्षा मजबूत आहे. 


डिजिटल स्वरुपात रुपया सुरु होणार
भारतात क्रिप्टोकरन्सी सुरु करण्यासाठी आरबीआयने तयारी सुरु केली आहे. भारतातील ही डिजिटल करन्सी व्हर्चुअल असेल. मात्र देशाचे मूळ चलन हे रुपयाच असेल. म्हणजे डिजिटल स्वरुपात हा रुपया असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सीबीडीसीएसद्वारे (CBDC) सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र, याबाबत निश्चित कालमर्यादा दिलेली नाही. आरबीआयकडून त्याचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे. 


संबंधित बातम्या :