नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे.

भाजपच्या दलित कार्डला टक्कर देण्यासाठी काँग्रेस किसान कार्ड पुढे आणण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी हरित क्रांतीचे प्रणेते आणि ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांच्या नावाला पहिली पसंती दिली आहे.

महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी शिवसेनेनेही राष्ट्रपतीपदासाठी स्वामीनाथन यांचंच नाव सूचवलं होतं. पण, भाजपनं रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं, ज्यामुळं शिवसेना काहीशी नाराज आहे.

त्यामुळं याच नाराजीचा फायदा घेत एनडीएत फूट पाडण्यासाठी काँग्रेस स्वामीनाथन याचं नाव पुढे करण्याच्या तयारीत आहे. स्वामीनाथन यांच्यानंतर कृष्ण गांधी यांना काँग्रेसनं दुसरी पसंती दिली आहे. पण, यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा सहकारी पक्षांसोबतच्या चर्चेनंतरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

असं असलं तरी शिवसेना आता कोणाच्या बाजूने उभे राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरेंचा नकारात्मक सूर 

भाजपने राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा देऊन मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेना मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावावर प्रचंड नाराज आहे. फक्त दलितांच्या मतावर डोळा ठेवून भाजपनं कोविंद यांच्या नावाची घोषणा केली असून, मतांसाठी हे राजकारण चुकीचं आहे, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.

संबंधित बातम्या

रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!

राष्ट्रपती निवडणूक : सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार यांची नावं चर्चेत 

रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन