मुंबई : क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीने आम्रपाली ग्रुपविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले 40 कोटी रुपये थकवल्याचा दावा धोनीने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. मात्र आम्रपाली ग्रुपने करारानुसार आपलं मानधन दिलं नसल्याचा आरोप धोनीने केला आहे.
घर खरेदीत अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आम्रपाली ग्रुपवर आहे. आम्रपाली ग्रुपने पैसे घेऊन घर न दिल्याचा आरोप 45 हजार ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी आम्रपाली ग्रुपविरोधात सुप्रीम कोर्टात याचिक दाखल करण्यात आली आहे. आता धोनीनेही याचिका दाखल केल्याने पुन्हा एकदा आम्रपाली ग्रुप वादात सापडला आहे.
धोनी 2009 ते 2015 पर्यंत आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. 2016 मध्ये धोनी आम्रपाली ग्रुपपासून वेगळा झाला. मात्र आम्रपाली ग्रुपने करारानुसार ठरलेली रक्कम आपल्याला दिलीच नाही, असं धोनीने याचिकेत म्हटलं आहे.
पैसे घेऊन घर न दिल्याने ग्राहकांनी सोशल मीडियावर आम्रपाली ग्रुपविरोधात मोहिम उघडली होती. या मोहिमेनंतर धोनीने आम्रपाली ग्रुपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ब्रँड अॅम्बेसेडर या नात्याने धोनीने आपल्या बाजूने बोललं पाहिजे असं फसवणूक झालेल्या ग्राहकांची मागणी होती.
गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने आम्रपाली ग्रुपविरोधात कडक पाऊलं उचलत ग्रुपचे डायरेक्टर अनिलकुमार शर्मा, शोवा प्रिया आणि अजय कुमार यांना अटक केली होती. सध्या या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.