भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने फ्रेण्डशीप डे फारच अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याने आपल्या वडिलांचे 46 लाख रुपये मित्रांना दान केले. आता ही रक्कम परत मिळवण्याचं काम पोलिसांच्या मदतीने सुरु आहे.

संबंधित विद्यार्थ्याने एका कामगाराच्या मुलाला सरसकट 15 लाख रुपये दिले, तर गृहपाठ करण्यात मदत करणाऱ्या मित्राला त्याने तीन लाखांची मदत केली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने याविषयी बातमी दिली आहे.

दानधर्म करणाऱ्या मुलाचे वडील व्यवसायाने बिल्डर आहेत. प्रॉपर्टी विक्रीतून मिळालेली 60 लाखांची रोकड त्यांनी कपाटात ठेवली होती. मात्र ही रक्कम अचानक सापडेनाशी झाल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

बाहेरच्या व्यक्तीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांना वाटत नव्हती. अखेर त्यांना हे गूढ उकलण्यात यश आलं. मात्र त्याने हे पैसे का वाटले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विद्यार्थ्याकडून रोकड मिळालेल्या एकाने नवीन कार विकत घेतली, तर 15 लाख मिळालेला कामगाराचा मुलगा बेपत्ता आहे. विद्यार्थ्याच्या शाळा आणि क्लासमधील जवळपास 35 जणांना रोख रकमेशिवाय स्मार्टफोन आणि चांदीची ब्रेसलेट्सही मिळाली.

'दानशूर' विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना मित्रांची यादी दिली असून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. सर्वाधिक रक्कम मिळालेल्या पाच जणांच्या पालकांना पोलिसांनी समन्स बजावला आणि पाच दिवसात पैसे परत करण्यास बजावलं. सर्व जण अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नाही.