नवी दिल्ली : कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प शरद पवारांमुळे रखडला असल्याचा आरोप भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. केंद्रानं तयारी दाखवूनही प्रतिसाद न दिल्यानं प्रकल्प थंड बासनात आहे असा आरोप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा केंद्रीय टास्क फोर्सला भेटल्यावर केला आहे.
शरद पवारांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प होऊ दिला नसल्याचा आरोप भाजप खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी केलाय. ते म्हणाले की, केंद्र सरकारनं 2011 मध्ये राज्याला पत्र पाठविले. तत्कालीन खासदार शरद पवार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी प्रतिसाद दिला नाही. केवळ निवडणुकीसाठी या मुद्द्यांचा वापर केला आहे, असं ते म्हणाले. यासाठी भाजपचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचं रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात तयार करण्यात आला. केंद्रानं प्री फिजिबलिटी रिपोर्ट 2011 मध्ये राज्य सरकारला पाठवला. त्यानंतर दोन ते तीन वेळा केंद्रानं राज्याला सहकार्य करण्यासंदर्भात तयारी दर्शविली. केंद्र सरकारने अनुकूलता दर्शविली होती. परंतु राज्याने प्रतिसाद दिला नाही, असं निंबाळकर म्हणाले.
निंबाळकर म्हणाले की, सांगोला आणि माण तालुक्यासाठी पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करतोय. पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लांबविण्यासाठी शरद पवारांनी या प्रकल्पाचा वापर केला. या प्रकल्पाला 16 हजार कोटी खर्च लागणार आहे. 40 टक्के खर्च राज्य सरकार करणार होते तर 60 टक्के खर्च केंद्र सरकार करणार होतं, असंही ते म्हणाले.