पोटच्या मुलीवर चाकूने वार, 4 महिन्याच्या चिमुकलीची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2016 03:13 AM (IST)
नवी दिल्ली: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईला परमेश्वराची आपमा दिली आहे. 'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' असे आपण म्हणतो. आपल्या तान्हुल्याला छोटीशी इजा जरी झाली, तर त्या मातेच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी येतं. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत, जिथे, वंशाला दिवा पाहिजे म्हणून, एका निर्दयी आईने आपल्या चार महिन्याच्या चिमुकलीचा जीव घेतला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली. येथील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या नेहा गोयल हिने आपल्या पोटच्याच मुलीचा जीव घेतला आहे. नेहाला सदैव मुलगाच हवा होता. नुकतीच तिची प्रसुती होऊन तिला दुसऱ्यांदा कन्या रत्न मिळाल्याने ती दु:खी होती. त्यामुळे 26 ऑगस्ट रोजी तिने आपली मुलगी माहीवर चाकूचे वार करून तिची हत्या केली. यानंतर तिने माहीचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या एसी रुममधील एका डब्यात ठेवला. नेहाचं कुटुंब जयपूरमधील व्यापारी असल्याने पोलिसांना सुरुवातीला हे काम बाहेरच्या व्यक्तीचे असल्याचा संशय होता. पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना अनेक पुरावे मिळाले. पोलिसांना नेहाच्या नखांवर रक्ताचे डाग आढळले. तसेच त्यांच्या घराच्या बाथरूममध्येही रक्त सांडल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी नेहाचा मोबाईल जप्त करून तपासणीस पाठवला. त्यावेळी तिने मोबाईलवर मुलगा होण्याचे उपाय आणि औषधांची माहिती सांगणाऱ्या अनेक संकेतस्थळांना तिने भेट दिल्याचे आढळले. यानंतर नेहाची अधिक चौकशी केली असता तिनेही गुन्हा कबूल केला. नेहाच्या या कृतीमुळे आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. सुशिक्षित आणि सर्वगुण संपन्न कुटुंबातून असूनही तिच्या या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.