मुंबई : येत्या पाच दिवसात मान्सून केरळात पोहचणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. महाराष्ट्रात मात्र मान्सूनचं आगमन 10 जूननंतरच होईल असं सांगण्यात येत आहे. वेधशाळेच्या कृषीविषयक अंदाजपत्रात याविषयी भाकित करण्यात आलं आहे.


 

खासगी संस्था स्कायमेटनंही मुंबईतल्या मान्सूनचा प्रवेश 12 ते 13 जूनपर्यंत होईल असं सांगितलं आहे. मान्सून उशिरा पोहचणार असला तरी त्यानंतर मात्र महाराष्ट्रात चांगला पाऊस असल्याचं भाकित वेधशाळेनं वर्तवलं आहे.

 
पुढील पंधरवड्यात केरळ आणि कर्नाटकमध्ये सामान्य तर मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दरम्यानच्या काळात मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरी येण्याची शक्यता आहे.