सुरत : गुजरातच्या सुरतमधल्या ऊघाना परिसरात एका तरुणीने बिल्डिंगमधून उडी मारुन आत्महत्या केली आहे. वात्सल्य अपार्टमेंटच्या 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन दिव्या बोरखतरियाने आयुष्य संपवलं. प्रेमप्रकरणाबाबत पालक नाखुश असल्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं वृत्त आहे.

 
दिव्याच्या स्कूटीच्या डिकीतून सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. आई-वडिलांच्या नावे लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अंत्यसंस्कारांवर खर्च न करता गोव्यात जाऊन एक-एक पेग मारा असा उल्लेख आहे.

 
काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?

 

माझं पालनपोषण केल्याबद्दल आभार. तुम्ही माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. लग्नासाठी दोन वर्ष वाट बघ किंवा ब्रेकअप कर. मी दोन वर्ष वाट पाहू शकत नव्हते. त्यामुळे माझ्याकडे एकच पर्याय उरला. जेव्हा तुम्ही ही चिठ्ठी वाचत असाल, तेव्हा मी निवडलेल्या पर्यायाविषयी तुम्हाला समजलं असेलच.

 
आई, तुझे रोजचे टोमणे ऐकून मी वैतागले होते. माझ्यात आणखी हिंमत उरलेली नाही. जिगर (भाऊ) मम्मी-पप्पांची काळजी घे, त्यांना आनंदात ठेव. मोठं होऊन त्यांचं नाव उज्ज्वल कर. लव्ह यू मम्मी, पप्पा, भाऊ आणि आजोबा.
---

20 वर्षीय दिव्या एसवायबीकॉमची विद्यार्थिनी होती. कॉलेजसोबतच ती ब्यूटी पार्लर आणि कोचिंग क्लासेसही चालवत होती. सहा महिन्यांपूर्वी ती एका ऑफिसमध्ये डाटा एन्ट्रीचं काम करत असे. तिथल्या एका तरुणासोबत तिचं प्रेम जुळलं. मात्र याची कुणकुण ऑफिसमध्ये लागताच दोघांनाही कामावरुन काढून टाकण्यात आलं.

 
दिव्याला त्या तरुणासोबत लग्न करायचं होतं. तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिली, मात्र तिच्यापुढे दोन अटी ठेवल्या. शिक्षण पूर्ण करुन लग्नासाठी दोन वर्ष वाट बघ किंवा ब्रेकअप कर. मात्र राग डोक्यात घालून तिने शनिवारी वात्सल्य सोसायटी गाठली. स्कूटी पार्क करुन लिफ्टने 11 व्या मजल्यावर गेली आणि उडी मारुन आयुष्य संपवलं.