Monsoon Session : उद्यापासून (20 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (19 जुलै) केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनासंदर्भातील अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच हे अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे.


राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी बोलावलेली बैठक केली रद्द


अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्याची परंपरा आहे. यामध्ये सरकारचे ज्येष्ठ मंत्री सहभागी होतात. तसेच विविध पक्षांचे नेते आपापले मुद्दे या बैठकीत मांडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. परंतू अनेक पक्षांच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे ती बैठक स्थगित करावी लागली. 18 जुलै रोजी विरोधी पक्षांचे नेते बंगळुरू येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होते. त्याच दिवशी दिल्लीत एनडीए पक्षांची बैठक सुरू होती. त्यामुळं कालची बैठक रद्द करावी लागली. 


मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली वरिष्ठ मंत्र्यांची बैठक 


दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल हेही उपस्थित होते. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा व्हावी याबाबतचे मुद्दे तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


संसदेचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता


पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षअखेरीस अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुका होमार आहेत. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजप आणि इतर पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकार एक विधेयक आणणार असून, त्यावर बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील विविध पक्षांना या विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. विधेयकाला विरोध करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसनेही केजरीवालांना पाठिंबा दिला आहे.


यासोबतच काँग्रेस आणि इतर पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि महागाईचा मुद्दाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वादळी ठरु शकतो. 


महत्त्वाच्या बातम्या: