Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत असताना आता दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून (Monsoon 2022) देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, नैऋत्य मान्सून 15 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, पूर्व मॉन्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 14 ते 16 मे दरम्यान द्वीपसमूहात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 आणि 16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सूनमुळे देशात 70 टक्के पाऊस
साधारणपणे मान्सूनची सुरूवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो. भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत.
दरम्यान, काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत तीन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हमाना विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी दिल्लीत कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 16 मे रोजी तापमानात किंचित घट होणार असून कमाल तापमान 42 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या