नवी दिल्ली : भारतात आता कोरोना रुग्णांवर अॅन्टिबॉडी कॉकटेलचा वापर करायला सुरुवात झाली आहे. हे अॅन्टिबॉडी कॉकटेल ड्रग सोमवारी लॉन्च करण्यात आलं होतं. रॉश आणि सिपला या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. याच्या एका डोसची किंमत ही 59 हजार 750 रुपये इतकी आहे. या औषधाच्या पॅकमध्ये दोन डोस असून त्याची एकूण किंमत ही एक लाख 19 हजार 500 रुपये इतकी आहे. 


हरयाणातील 84 वर्षीय मोहब्बत सिंह या व्यक्तीला देशातील पहिल्या अॅन्टिबॉडी कॉकटेलचा डोस देण्यात आला आहे.  मोहब्बत सिंह गुरुग्राममधील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. 


मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी म्हणजेच ज्याला कॉकटेल ड्रग्ज म्हटलं जातं त्याचा वापर आता भारतात काही ठिकाणी सुरु करण्यात येत आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी घेतल्यास लोकांना कोरनाची लागण होण्याचा धोका अत्यंत कमी असतो हे अनेक अभ्यासातून सिद्ध झालंय. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे कोरोना विरोधातील प्रमुख हत्यार आहे असं मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 


काय आहे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी? 
मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे एक कॉकटेल ड्रग्ज आहे की जे घेतल्यानंतर कोरोना रुग्णाची प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांचा समावेश आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीमुळे कोरोना मानवी शरीरात पसरत नाही, कारण त्याला आवश्यक ते खाद्य मिळत नाही. याची साठवणूक ही 2 ते 8 डिग्री सेल्सियसमध्ये केली जाते. 


एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्याला हे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी तीन दिवसांच्या आत द्यावं लागतं. हे एक प्रकारचं इम्युनिटी बुस्टर आहे. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. तसेच त्याला रुग्णालयात भरती होण्याचीही गरज राहत नाही. भारतात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असताना याच्या वापराला परवानगी मिळाली तर मोठं यश असणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :