नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आधी नऊ टक्के होता, त्यामध्ये तीन टक्क्यांची भरत घालत 12 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात माहिती दिली.


आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करुन मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. वाढ केलेल्या महागाई भत्त्याचा 1 जानेवारी 2019 पासून याचा लाभ मिळणार आहे. 48.41 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62.03 लाख निवृत्ती वेतनधारक मिळून तब्बल 1 कोटी 10 लाख 44 हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.

आजच्या कॅबिनेट बैठकीत माध्यान्ह भोजन योजनेच्या नियमांमध्येदेखील सुधारणा करण्यात आली आहे. नव्या नियमांना कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वर्ष 2019-20 मध्ये या योजनेवर 12 हजार 54 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. अतिरिक्‍त रक्कम खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग देणार आहे.