नवी दिल्ली : 2019 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यात होणार आहे. तर निवडणुकीआधी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अलिकडचे काही दिवस भाजप नेत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरत आहेत. महत्त्वाचे अनेक नेते आजारी असल्याने मोदी सरकारची चिंता वाढली आहे.

भाजपचे कोणकोणते नेते आजारी?

अमित शाह 

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्लूमुळे अमित शाह पुढील दोन-तीन दिवस ते हॉस्पिटलमध्येच राहण्याची शक्यता आहे.

अरुण जेटली

केंद्रीय मंत्री अरुण जेटलीही आजारी आहेत. कॅन्सरचं निदान झाल्यावर ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहे. त्याआधी 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या गैरहजेरीत अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

रवीशंकर प्रसाद

श्वसननलिकेत त्रास होत असल्याने केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनाही सोमवारी (14 जानेवारी) एम्समध्ये दाखल केलं होतं. त्यांना आयसीयूमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सुषमा स्वराज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आगामी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये प्रकृती बिघडल्याने सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होत. माझी किडनी निकामी झाली असून डायलिसिसवर असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून सार्वजनिक कार्यक्रमात त्या फारच कमी दिसतात.

रामलाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव रामलाल यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना नोएडामधील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर 2018 च्या सुरुवातीला त्यांच्या तीन महिने उपचार सुरु होते. यानंतर एम्समध्येही त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ते ड्रिप लावून मंत्रालयात पोहोचले होते.

संबंधित बातम्या

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू

अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान, अमेरिकेला गेल्याने अर्थसंकल्पाला मुकणार?

मनोहर पर्रिकरांना स्वादुपिंड कर्करोग, गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

दिल्लीत स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण