कोल्हापूर : जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात अज्ञात जमावाने ख्रिस्ती धर्मियांची प्रार्थना सुरू असताना हल्ला केल्याची घटना घडली. या जमावाने केलेल्या हल्ल्यात 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील केएलइ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कोल्हापूरातल्या चंदगड तालुक्यातील कोवाड या गावात प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिस्ती बांधवांवर अज्ञात जमावाने हल्ला केला. येथील एका घराच्या बेसमेंटमध्ये गेले आठ वर्ष परिसरातील ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी येतात. 23 डिसेंबरला रविवारी नेहमीप्रमाणे प्रार्थना सुरु होती. दुपारी अज्ञांतांची टोळी दुचाकीवरुन आली आणि त्यांनी प्रार्थना करणाऱ्यांवर हल्ला चढवला. काठ्या, दगडचा वापर करुन हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दुचाकी, चार चाकी गाड्यांचंही नुकसान झालं आहे.

हल्लेखोर सध्या फरार असून चंदगड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.