प्रवीण तोगडिया सकाळपासून बेपत्ता
विश्व हिंदू परिषदेने आंतरराष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. समर्थकांनी आंदोलन करत प्रवीण तोगडिया यांचा शोध घेण्याची मागणी केली. राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडियांना ताब्यात घेतलं असल्याचा दावा विहिंप कार्यकर्त्यांनी केला आहे.
प्रवीण तोगडियांना गुजरात पोलीस किंवा राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याचा दावा गुजरात गुन्हे शाखेने केला आहे. अटक वॉरंट घेऊन पोलीस आले होते, मात्र तोगडिया सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांना अखेरचं काल रात्री अहमदाबादमध्ये रिक्षाने जाताना पाहिलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
तोगडियांना पोलिसांनी अटक केल्याचा दावा
दरम्यान, विहिंप कार्यकर्त्यांनी सोला पोलीस स्टेशनला (गुजरात) घेराव घातला, घोषणाबाजी केली आणि गांधीनगरला जाणारा रस्ता अडवत तातडीने प्रवीण तोगडिया यांचा शोध घेण्याची मागणी केली. प्रवीण तोगडिया सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत याची माहिती ठेवणं आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं विहिंपचे गुजरातचे महासचिव रणछोड भारवाड यांनी म्हटलं आहे.
तोगडियांना अटक केली आहे किंवा नाही याची खात्री अजून झाली नसल्याचं भारवाड यांनी म्हटलं आहे.
राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडिया यांना एका जुन्या प्रकरणात अटक केली असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते जय शाह यांनी केला आहे. प्रवीण तोगडिया यांना एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी विहिंप मुख्यालयातून ताब्यात घेतलं आणि सोबत घेऊन गेले, असं जय शाह यांनी म्हटलं आहे.
राजस्थान पोलिसांचं स्पष्टीकरण
दरम्यान, ''राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडियांना अटक केलेली नाही. माझ्या आदेशानुसार गंगापूर (राजस्थान) पोलिसांचं पथक त्यांना अटक करण्यासाठी गेलं होतं, मात्र ते न मिळाल्याने पोलीस माघारी परतले. त्यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली असल्याची अफवा आहे'', असं स्पष्टीकरण राजस्थानमधील भरतपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक आलोक कुमार वशिष्ठ यांनी दिलं आहे.