Online Gaming Advisory: कोरोना महामारीची (Corona Virus) सुरुवात झाल्यापासून शाळा बंद असल्यानं मुलं घरात कोंडली गेली. घरात बसून मोबाईलचा अतिवापर वाढल्यानं मुलांना त्याची सवय लागली आहे. मोबाईलवर गेम खेळण्याचं मुलांना व्यसनच जडलं आहे. हे वाढतं प्रमाण चिंताजनक असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळं केंद्राच्या शिक्षण मंत्रालयानं 'ऑनलाइन गेम' सुरक्षित करण्यासाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  केंद्राकडून पालक, शिक्षकांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


यात आईवडिल आणि शिक्षकांना काही 'काय करावं आणि काय नाही' याबाबत सल्ले देण्यात आले आहेत. यात म्हटलं आहे की, आईवडिलांच्या अनुमतीशिवाय अशा ऑनलाईन गेम्स खरेदी करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ऑनलाईन गेम्सची  सदस्यता घेण्यासाठी अॅपवर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड रजिस्ट्रेशन करु नये. 


पालकांच्या परवानगीशिवाय ऑनलाईन गेम खरेदी करण्याची मुभा नसावी. तसेच पेमेंट ऑप्शन ओटीपी आधारीत असावा. तसेच प्रत्येक देवाण घेवाणाच्या खर्चाची कमाल मर्यादा निर्धारीत केली जावी.  तसेच अशा गेम्स खेळताना खरं नाव देणं टाळलं पाहिजे.  सोबतच लॉगिन आणि अन्य महत्वाच्या गोष्टी नियंत्रित करण्यासाठी देखील काही सूचना दिल्या आहेत.  


शिक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे की, हे गेम खेळण्यानं पुढं चालून जुगार खेळण्याचं देखील व्यसन लागू शकतं. जो की एक विकार मानला जातो. या गेम्सला अशा पद्धतीनं बनवलेलं असतं की, तो प्रत्येक टप्प्यात आधीच्या तुलनेत कठिण होत जातो.  मुलांना अज्ञात वेबसाइटवरुन सॉफ्टवेअर किंवा गेम डाउनलोड न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. 


सल्ला देताना मंत्रालयानं म्हटलं आहे की,  मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं देखील याकडे गांभीर्यानं पाहिलं जावं. खूप वेळापर्यंत गेम खेळणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळं मानसिक आणि शारिरीक तणावात मुलं जाऊ शकतात, असं यात म्हटलं आहे.  ऑनलाइन गेम खेळताना वेब कॅम किंवा ऑनलाइन चॅटच्या माध्यमातून कुठल्याही अनोळखी व्यक्तिसोबत बोलू नये. तसेच खेळताना काहीही संशयास्पद वाटलं तर तात्काळ खेळणं बंद करावं, असंही यात म्हटलं आहे.