नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (21 डिसेंबर) आपल्या सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना नारळ देण्याच्या तयारी सुरु झाल्याचं बोललं जात आहे. मागील सरकारमध्येही नरेंद्र मोदींनी अशाचप्रकारे मंत्र्यांच्या कामाचा वर्षभरानंतर आढावा घेतला होता. मात्र विद्यमान सरकार स्थापन होऊन अवघे 6-7 महिने झाले आहेत. त्यामुळे नक्की मोदी काय भूमिका घेणार, हे आठवडाभरात स्पष्ट होईल.


केंद्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना आपले रिपोर्ट कार्ड घेऊन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवासस्थानी बोलावलं आहे. यावेळी त्यांना आपल्या खात्याच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण द्यावं लागणार आहे. जे मंत्री प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत, त्यांना प्रमोशन मिळू शकतं आणि ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


मोदी सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. आधी तिहेरी तलाक, कलम 370 आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा यासारखे महत्त्वाचे निर्णय मोदी सराकारने घेतले. या महत्त्वाच्या निर्णयादरम्यान मंत्र्यांच्या कामगिरीची माहिती घेणे शक्य झालं नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ वाटपानंतर मंत्र्यांवर काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. मंत्र्यांनी सर्व जबाबदाऱ्यां नीट निभावल्या आहेत की नाही? याची तपासणी मोदी करणार आहेत. त्यामुळे विविध मंत्र्यांच्या भावी योजना काय आहेत, विद्यमान मंत्री सरकारमध्ये किती फिट आहेत, हे यातून स्पष्ट होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजी आपल्या दुसऱ्या टर्मची सुरुवात केली होती. मोदींनी 57 मंत्र्यासह शपथ घेतली होती. नियमानुसार लोकसभेतील एकूण खासदारांच्या 15 टक्के म्हणजे 81 खासदारांना मंत्रीपदं दिली जाऊ शकतात. नरेंद्र मोदींच्या गेल्या सरकारच्या मंत्रिमंडळात 70 मंत्र्यांचा समावेश होता.