Lockdown News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राहस काही राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जातायेत. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उद्यापासून पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.
हरियाणात वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे निर्बंध कडक करण्यात आलेत. शाळा, महाविद्यालये, आंगणवाडी केंद्र बंद करण्यात आलेत. राज्यात 12 जानेवारीपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद राहणार आहेत. 12 तारखेनंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातही कोरोना निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्र्यांनी तसा इशारा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतेनं राज्यात पुन्हा एकदा शाळा बंद होतील का? अशी चर्चा सुरु झालीय़. आधीच दीड वर्ष शाळा बंद होत्या. त्यानंतर महिन्याभरापूर्वी शाळा कुठे सुरु झाल्या आहेत. आणि त्यातही आता शाळा बंद होण्याचं चिन्हं निर्माण झालीयेत..
महाराष्ट्रात काय निर्बंध ?
रात्रीची संचारबंदी
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.
दिल्लीत काय निर्बंध?
रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी
शाळा महाविद्यालये बंद
थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद
दुकाने सकाळी दहा ते रात्री 8 या वेळेत सम विषम तत्त्वावर सुरु राहतील.
मेट्रो आणि बसेस 50 टक्केंच्या क्षमतेने सुरु राहतील.
रेस्टॉरंट्स, बार 50 टक्के क्षमतेने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील.