चंदीगड : महान भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर आज शासकीय इतमामात चंदीगडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, पंजाबचे राज्यपाल आणि पंजाबचे क्रीडामंत्र्यांसह इतर मान्यवर स्मशानभूमीत उपस्थित होते. तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मिल्खा सिंगच्या सन्मानार्थ पंजाबमध्ये एक दिवसाचा शासकीय दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.


शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता मिल्खा सिंग यांचे चंदीगड पीजीआय रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांची पत्नी निर्मल कौर यांचेही या आठवड्यात निधन झाले आहे. दोघांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती.


देशभरात दुःख व्यक्त
मिल्खा सिंग यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह संपूर्ण राष्ट्राने त्यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, त्यांचा संघर्ष आणि संघर्षाची कहाणी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.


राष्ट्रपतींनी ट्विट केले की, "क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मिल्खा सिंग यांचे निधन झाल्याने दु: खी आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी भारतात येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देईल. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि असंख्य चाहत्यांसोबत सहवेदना व्यक्त करतो."


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, "मिल्खासिंग जी यांचे निधन झाल्यामुळे असंख्य भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान असणारा एक महान खेळाडू आम्ही गमावला आहे. आपल्या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचे लाखोंनी चाहते होते. त्यांच्या मृत्यूने मी दु:खी आहे."


पीएम मोदी पुढे लिहिले, “मी काही दिवसांपूर्वी श्री मिल्खा सिंह जी यांच्याशी बोललो होतो. मला हे माहिती नव्हतं की हे आमचे शेवटचं बोलणं असेल. अनेक नवोदित खेळाडूंना त्याच्या आयुष्यातून प्रेरणा मिळेल. त्याच्या कुटुंबीयांबद्दल आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांबद्दल माझ्या सहवेदना आहेत."


चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मिल्खाने 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकले होते. त्यांची उत्कृष्ट कामगिरी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये त्यांनी 400 मीटरच्या अंतिम फेरीत त्यांनी चौथे स्थान मिळवले होते. तर 1956 आणि 1964 ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1959 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.