Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणावत आहे, तर कुठं पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान खात्यानं (Indian Meteorological department) दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावी. फळझाडे आणि भाजीपाला यांना यांत्रिक सहाय्य देणं आवश्यक आहे. जेणेकरून वाऱ्यामुळं झाडे खराब होणार नाहीत.
हवामान लक्षात घेता, भारतीय हवामान विभागाने (IMD) शेतकऱ्यांना जोरदार वाऱ्याच्या वेळी सिंचन आणि खतांचा वापर थांबवावा. उघड्यावर उभे राहणे किंवा शेतात काम करणे टाळण्यास सांगितले आहे. तसेच, वादळ किंवा विजांचा गडगडाट सुरु असताना शेतातील जनावरे सुरक्षीत ठिकाणी ठेवावीत असे आवाहन हवामान विभागानं केलं आहे. 13, 14 आणि 16 तारखेदरम्यान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. 13 ते 17 मार्च दरम्यान गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये, ओडिशामध्ये 14 ते 18 मार्च दरम्यान, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये 16-18 मार्च दरम्यान आणि पश्चिम मध्य प्रदेशात 18 मार्च रोजी हलका पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी
दिवसाचे तापमान हळूहळू वाढत असल्यानं देशाच्या मैदानी भागात प्रामुख्याने कोरडे हवामान अपेक्षित आहे. त्यामुळं ओलावा कमी होऊ नये म्हणून तीळ, मका, कडधान्ये, भुईमूग आणि फळबागा आणि भाजीपाला आवश्यकतेनुसारच पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भाताचा पेंढा, कोरडी पाने किंवा वनस्पतींचे अवशेष टाकून पालापाचोळा करा. केळीच्या झाडांना मल्चिंग मटेरियलने झाकून टाका. फळांची गळती कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आंब्यावर नियमित अंतराने फवारणी करा आणि पाणी द्या. हवामान विभागाच्या मते, 13 आणि 14 रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे. आसाम आणि मेघालय, पंजाब, केरळमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. हिमाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट झाली आहे.
पुढील 7 दिवसात या ठिकाणी पाऊस पडणार
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 7 दिवसात अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 ते 15 मार्च दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, रायलसीमा आणि तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये पुढील 3 दिवसांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: