नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम' करण्याची वेळ आहे. यात गुगलसह मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मोबाईल मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणारी कंपनी हाईकचे कर्मचारीही वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर 40 हजार रुपये खर्च करणार आहे. कंपनीने परिपत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली.

खुर्ची-टेबलसाठी 10 हजार रुपये मिळणार
कंपनीने म्हटलं आहे की, या सुविधेअंतर्गत आम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसप्रमाणेच आरामशीर खुर्ची आणि टेबल उपलब्ध करुन देणार आहे. तर जे कर्मचारी सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये नाहीत, त्यांना टेबल आणि खुर्ची खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातील. याशिवाय कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना इंटरनेट आणि आयटी डिवाईसही उपलब्ध करुन देणार आहे.


ऑफिसही खुलं राहणार
दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या स्पेसिफिक टेक्नोलॉजीचा वापर करायचा आहे, त्यांच्यासाठीही ऑफिस खुलं राहिल. कंपनीची माहितीनुसार, ऑफिसमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित अंतरासह स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.


ग्लोबल इन्वेस्टर सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल, टेनसेंट, फॉक्सकॉन आणि भारती एन्टरप्रायजेस यांच्यासारखे गुंतवणूकदार असलेल्या हाईकचे सध्या 160 कर्मचारी आहेत.