नवी दिल्ली : प्रस्तावित बीफ पार्टीला विरोध केल्याने मेघालयमधील भाजपच्या एका स्थानिक नेत्याने राजीनामा दिला. मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बीफ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पक्षातील वरिष्ठांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर या नेत्याने राजीनामा दिला.
फुटीरतावाद्यापासून नेता बनलेल्या या नेत्याचं नाव बर्नार्ड मरक असं आहे. इशान्येकडील आदिवासी लोक त्यांच्या खास शैलीत कोणत्याही उत्सवाचं आयोजन करतात. गारो हिल्स उत्सवात गायीचा बळी दिला जातो. त्यामुळे मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानेही बीफ पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र पक्षाने त्याला नकार दिला, अशी माहिती बर्नार्ड मरक यांनी दिली.
गारो समाजाची संस्कृती आणि पंरपराच दिसत नसेल, तर त्या राजकीय पार्टीला काहीच अर्थ नाही. आम्ही काय खायचं याचा निर्णय भाजप घेऊ शकत नाही, असं बर्नार्ड मरक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यापूर्वीही बर्नार्ड मरक यांनी मेघालयातील अनेक भाजप नेते गोमांस खात असल्याचा आरोप केला होता. मेघालयसारख्या भागात गोमांस खाण्यावर बंदी आणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण येथील भाजप नेत्यांना मेघालयची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि घटनात्मक तरतुदींची चांगली माहिती आहे, असं बर्नार्ड मरक म्हणाले होते.
मेघालयमध्ये भाजपची 2018 मध्ये सत्ता आल्यास गोमांस खाण्यावर बंदी घालण्यात येणार नाही. शिवाय कत्तलखान्यांना कायदेशीरपणे मान्यता देण्यात येईल, ज्यामुळे गोमांस आणि इतर मांसाचे दर कमी होतील, असं बर्नार्ड यांनी म्हटलं होतं.