Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ हत्याकांडाने देश हादरला आहे. मुस्कानने सौरभची हत्या का केली याचं खरं कारण समोर आलं आहे. सौरभ खून प्रकरणातील आरोपपत्र पोलिसांनी जवळपास तयार केले आहे. मुस्कान आणि साहिलने सौरभला का मारलं? यामागे तंत्र-मंत्र याचा काहीही संबंध नाही. तर त्या प्रकरणाचे खरे कारण समोर आले आहे. मुस्कानने साहिलसोबत सौरभची हत्या केल्याचे पोलिस तपासात आणि केस डायरीच्या वाचनात स्पष्ट झाले आहे. याबाबतचे पुरेसे पुरावे देखील समोर आले आहेत. पोलिस लवकरच आरोपपत्र न्यायालयात दाखल करणार आहे.

Continues below advertisement

या हत्येमागे तंत्र-मंत्र या कृतीसारखे कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी केस डायरीमध्ये स्पष्ट केले. प्रेम प्रकरणामुळे साहिल आणि मुस्कानने सौरभची हत्या केली. साहिल आणि मुस्कान दोघेही ड्रग्ज व्यसनी होते आणि दोघांना एकत्र राहायचे होते. सौरभ जिवंत असताना दोघांचे लग्न होऊ शकणार नाही, त्यामुळे सौरभची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपपत्रात इलेक्ट्रॉनिक पुरावे, घटना स्थळावरून सापडलेले पुरावे आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे जबाब नोंदवले आहेत. मोबाईल, मृतदेह, रक्ताने माखलेले कपडे, पिशवी, ड्रम आणि रक्ताने माखलेले बेडशीट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

मुस्कान आणि साहिल यांना लग्न करायचे होते, त्यामुळे त्यांनी सौरभची हत्या केल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस तपासात तंत्र मंत्र यासारखा कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. साहिल आणि मुस्कान यांच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीचा या हत्येत सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. केस डायरीमध्ये पोलिसांनी सांगितले की, मुस्कानने चाकू, ड्रम आणि सौरभला बेशुध्द करण्यासाठी औषध आणले होते, तर साहिलने सिमेंट आणले होते. मृतदेह ड्रममध्ये बंद करण्याची कल्पना साहिलची होती, अशी माहिती समोर आलेली आहे. 

Continues below advertisement

सौरभचा मृतदेह 18 मार्च रोजी ब्रह्मपुरी येथील इंदिरानगर येथील त्याच्या राहत्या घरातून सापडला होता. मृतदेह एका ड्रममध्ये टाकून सिमेंट टाकून तो गोठवण्यात आला होता. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले, नंतर घर सील करण्यात आले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट सिमेंट ओतलं. एवढंच नाही तर यानंतर मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे त्यानंतर हिमाचल प्रदेशला फिरायला गेले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ राजपूतच्या हत्येच्या आधी मुस्कान रस्तोगी तिच्या बेशुद्ध पती सौरभ राजपूतच्या छातीवर बसली होती, तेव्हा तिचा प्रियकर साहिल शुक्लाने तिला चाकू दिला आणि सौरभच्या छातीत तीन वेळा वार करण्यासं सांगितलं होतं. राजपूतच्या छातीत तीन वेळा वार करण्यात आले होते, अशी माहिती आता शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. सौरभ राजपूतची मान कापलेली, त्याचे पाय कापलेले आणि धड तुटलेले होते, अशी माहिती शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं. 

मुस्कान रस्तोगी 27 वर्षांची असून 2016 साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले. दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानने 2019 साली एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले. मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.