आपने तीन महापालिकांमध्ये मिळून 48 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला केवळ 30 जागांवर समाधान मानावं लागलं. सत्ताधारी आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मोदी लाट नव्हे, ईव्हीएम लाट : आप
पराभवानंतर आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. दिल्लीतील ही मोदी लाट नाही, तर ईव्हीएम लाट आहे, असा आरोप आपने केला. भाजपला 2009 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशोधन केलं आहे. त्याच बळावर ते निवडणुका जिंकत आहेत, असा घणाघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला.
दरम्यान 2015 साली केजरीवाल यांनी याच ईव्हीएमने विजय मिळवला होता, असं प्रत्युत्तरही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिलं. भाजपला कौल दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या जनतेचे आभारही मानले.
दिल्लीतील पराभवानंतर दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. मात्र यश न मिळाल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा दिला.
दक्षिण दिल्ली महापालिका :
- भाजप-70
- काँग्रेस-12
- आप-16
- इतर-6
- एकूण - 104
उत्तर दिल्ली महापालिका:
- भाजप- 64
- काँग्रेस-15
- आप-21
- इतर- 3
- एकूण -103
पूर्व दिल्ली महापालिका :
- भाजप-47
- काँग्रेस-3
- आप-11
- इतर-2
- एकूण-63
दिल्ली महापालिका निवडणुकीत 272 वॉर्डपैकी दोन वॉर्डमधील उमेदवारांचं निधन झाल्यानं या वॉर्डमधील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे उर्वरित 270 वॉर्डसाठी 2537 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील सर्वात जास्त उत्तर दिल्लीतील 104 वॉर्डसाठी 1004 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दक्षिण दिल्लीतील 104 वॉर्डसाठी 985 आणि पूर्व दिल्लीतील 64 वॉर्डसाठी 548 उमेदवारांनी आपलं नशिब आजमावलं.
2012 च्या महापालिका निवडणुकीचं चित्र
2012 च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. एकूण 272 जागांपैकी 142 जागा भाजप, काँग्रेस 74, बसपा 15 आणि अपक्ष 41 जागांवर विजयी झाले होते.