मथुरा : पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर (Mathura Yamuna Expressway) अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात होऊन आग पसरून १३ जणांचा होरपळून मृत्यू (Mathura Yamuna Expressway)झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४३ जण जखमी झाले आहेत. अपघातात आठ बस आणि तीन लहान वाहने एकमेकांना धडकली, अशा माहिती पोलिसांनी दिली. बस्ती आणि उन्नाव येथील अपघातांत प्रत्येकी चार आणि मीरत व बाराबंकीतील अपघातांत प्रत्येकी दोन जण ठार झाले आहेत.(Mathura Yamuna Expressway)

Continues below advertisement

Yamuna Expressway Accident:  तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसल्याने...

या अपघातानंतर बसने पेट घेताच पार्वती नावाच्या महिलेने आपल्या दोन मुलांना खिडकीबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र ती तिचा जीव वाचवू शकली नाही. यावेळी तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसल्याने ती मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ती कोसळली. तिचा दीर गुलझारी याला रुग्णालयांमध्ये तिचा शोध कुठेही लागला नाही. पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक मृतदेह ओळखण्यापलिकडे आहेत. आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळ्या पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे. जळालेल्या मृतदेहांचे डीएनए तपासणी करून नातेवाइकांनी दिलेल्या माहितीशी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Yamuna Expressway Accident: नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती

पार्वती देवी तिच्या दोन मुलांसह उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तिच्या गावी नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती. मथुरा येथील शवागाराबाहेर उभ्या असलेल्या दीर गुलझारीच्या म्हणण्यानुसार, प्राची आणि सनी या दोन्ही मुलांनी सांगितले की त्यांना बाहेर काढत असताना त्यांची आई बसमध्ये बेशुद्ध पडली होती. त्यानंतर शोध घेऊनही काहीही सापडले नाही. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की १३ जणांचा मृत्यू होरपळून झाला आहे. मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे अशक्य होते.

Continues below advertisement

यमुनानगर एक्स्प्रेस वेवरील अपघाताची घटना ही बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या अपघातात १३ जणांचा होरपळल्यामुळे मृत्यू झाला. घटनास्थळी केवळ जळलेल्या बसगाड्या आणि कारचे सांगाडे उरले होते. ते रस्त्यावरून हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या. ‘यमुना एक्स्प्रेस वेच्या आग्रा ते नोएडा पट्ट्यात धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक वाहनांची धडक झाली. यातील काही वाहनांनी पेट घेतला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे मथुरेचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले. 

मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून, अखिलेंद्र प्रताप यादव (४४, प्रयागराज), रामपाल (७५, महाराजगंज) आणि सुलतान अहमद (६२, गोंडा) अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी (प्रशासन) अमरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बलदेव पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सोशल मिडीया  ‘एक्स’वरून अपघातातील मृतांच्या नातेवाइकांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.