Mundka Fire: पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची बातमीस समोर येत आहे. या आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती दुपारी 4.40 च्या सुमारास मिळाली, त्यानंतर 24 अग्निशामक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी रात्री 10.30 वाजता सांगितले की, मदतकार्य सुरू आहे. 26 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन मजली व्यावसायिक इमारतीत ही आग लागली आहे. बचाव कर्मचारी अद्याप तिसऱ्या मजल्यावर पोहोचलेले नाहीत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 10 जण जखमी झाले आहेत. इमारतीतून 60-70 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आगीची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “या दुःखद घटनेबद्दल ऐकून धक्का बसला. मी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आमचे शूर अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. देव सर्वांचे भले करो.''
दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) समीर शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की तीन मजली व्यावसायिक इमारतीमध्ये कंपन्यांची कार्यालये आहेत. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून सुरू झाली, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.