पणजी : थिवी रेल्वे स्टेशनवर काही दिवसांपूर्वी पाटणा- वास्को ट्रेनद्वारे मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार गोव्यात दाखल झाले असून, ही चिंतेची बाब आहे. ट्रेनमधून गोव्यात दाखल झालेल्या परप्रांतीय कामगारांबाबत चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली. प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पर्वरीचे आमदार रोहन खवटे यांनी विधानसभेत शून्य तासात केली. त्यावर मुख्यमंत्र्यानी चौकशीचे निर्देश दिल्याचे सांगितले.


थिवी रेल्वे स्टेशनवर 22 जुलै रोजी दाखल झालेल्या एका ट्रेनद्वारे मोठ्या संख्येने पुरुष व महिला परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत. सदर कामगार गोव्यात कशाला आले. ते कुठे काम करणार, राहणार कुठे याची काहीच माहिती उपलब्ध नाही. अशा प्रकारे कामगार गोव्यात येऊन काही वर्षांनी ते गोव्याचे मतदार बनतात. त्याबरोबर परप्रांतीय व्यक्‍तींकडून गुन्हे देखील केले जातात. त्यामुळे सुरक्षतेचा मुद्याही उपस्थित होत असल्या बद्दल खवंटे यांनी चिंता व्यक्त केली होती.


मुख्यमंत्री सावंत यांनी ट्रेनमधून आलेल्या परप्रांतीयांसंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोव्यात जितक्या कंपन्या आहेत त्यात गोमंतकीय किती व परप्रांतीय किती कामाला आहेत याचा तपशील सादर करण्यासही कामगार खात्याला सांगण्यात आले असल्याचे सांगितले.


दरम्यान, गोव्यातील कॅसिनोंमध्ये 80 टक्के कामगारवर्ग हा परप्रांतीय असल्याचा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केला. कॅसिनोंद्वारे सरकारला महसूल मिळत असल्याचे सांगून नोकरीची संधी देखील गोमंतकीयांना मिळाली पाहिजे,अशी मागणी आलेमाव यांनी केली.