नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला जवाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अजहरच्या भावाला आणि मुलाला पाकिस्तानने अटक केली आहे. मसूदचा भाऊ आणि मुलासह विविध संघटनांच्या 44 दहशतवाद्यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरुन वाढत्या दबावानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे.


कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या 44 दहशतवाद्यांपैकी मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ आणि मुलगा हम्माद अजहरचा समावेश आहे, अशी माहिती पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी दिली आहे. मुफ्ती अब्दुरनेच मसुदला सोडवण्यासाठी IC-814 या विमानाचं अपहरण केलं होतं, अशी माहिती मिळाली आहे.

भारताने गेल्या आठवड्यात पाकिस्तानला डॉजियर दिला होता. या डॉजियरमध्ये मुफ्ती अब्दुर रौफ आणि हम्माद अजहरचं नाव होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं शहरयार खान म्हणाले. शिवाय कोणाच्या दबावात येऊन ही कारवाई करण्यात आली नसल्याचंही ते म्हणाले.

बंदी घालण्यात आलेल्या सर्व संघटनांवर कारवाई केली जाईल, असं शहरयार खान म्हणाले. एफएटीएफकडे भारताने पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली होती. मात्र एफटीएफएने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवत चेतावनी दिली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे.