कुनेरु (आंध्र प्रदेश) : ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले आहेत. रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 39 वर पोहचला असून रेल्वे अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

जगदलपूरहून भुवनेश्वरच्या दिशेने जाताना रात्री 11 वाजताच्या सुमारास हिराखंड एक्स्प्रेसचा अपघात झाला. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून डबे हटवण्याचं काम सुरु केलं. या घटनेमुळे अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलवण्यात आले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे या सर्व घटनेचे अपडेट घेत आहेत.

दरम्यान, कुनेरु हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. रेल्वे अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय असला तरी यामागे नक्षलवाद्यांचा काही हात आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

रद्द आणि वळवलेल्या गाड्या :

  • 18309 संबलपूर-नांदेड एक्स्प्रेस रद्द

  • 12843 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस विशाखापट्टण, विजयवाडा, नागपूर, अहमदाबाद अशा मार्गाने वळवली

  • 13351 धनबाद-अलेप्पी एक्स्प्रेस तितीलगढ, रायपूर, नागपूर अशा मार्गाने वळवली

  • 18637 हातिया-येसवंतपूर तितीलगढ, रायपूर, नागपूर अशा मार्गाने वळवली

  • 12375 चेन्नई-असानोल एक्स्प्रेस खुर्दा रोड, अंगुल, झारसुगुंडाहून वळवली

  • 18310 नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस खुर्दा रोड-अंगुलहून वळवली

  • 12807 VSKP-NZM समता एक्स्प्रेस आणि 22847 VSKP -LTT एक्स्प्रेस धुव्वाडा-विजयवाडाहून वळवल्या