दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) दिल्ली काँग्रेसने (Delhi Congress) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनोज तिवारी (Manoj Tiwari) विरोधात कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने दिल्लीतील सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये हाय प्रोफाईल उमेदवार म्हणजे कन्हैया कुमार. कन्हैया कुमार आता दोन वेळा खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांना थेट आव्हान देणार आहेत. या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठ्या लढतींपैकी ही एक मानली जात आहे.


बिहारी विरुद्ध बिहारी


काँग्रेसने कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्याने दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी दोन बिहारी नेते आले आहेत. त्यामुळे ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस नसून, दोन बिहारींमध्ये होणार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने ईशान्येकडील जागेवर भाजपच्या बिहारी नेत्याविरुद्ध काँग्रेसने दुसऱ्या बिहारी नेत्याला उभं करून मोठी राजकीय खेळी केली आहे. दिल्ली ईशान्य मतदारसंघ उत्तर प्रदेशशी जोडलेला आहे. या भागात बिहार आणि हरियाणातील लोक मोठ्या संख्येने राहतात. या भागात पूर्वांचलमधील मतदारांची संख्याही मोठी आहे. 


भाजपला धूळ चारण्यासाठी काँग्रेसचा मोठा डाव


तज्ज्ञांच्या मते, पूर्वांचल आणि बिहारी मतदारांच्या संख्येमुळे मनोज तिवारी यांनी 2014 आणि 2019 च्या मागील दोन लोकसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे मतदार, पूर्वांचल, बिहारी मतांची जुळवाजुळव केल्यास या निवडणुकीत कन्हैया कुमार थेट मनोज तिवारी यांना आव्हान देऊ शकतात, असंही बोललं जात आहे. त्यामुळे कन्हैया कुमार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत आणखी रंजक बनली आहे.


काँग्रेसकडून दिल्लीतील 10 उमेदवारांची घोषणा


दिल्ली काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. ईशान्य दिल्लीतून काँग्रेसने कन्हैया कुमार यांना संधी दिली असून, ते भाजपच उमेदवार मनोज तिवारी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने दिल्लीतील चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल, ईशान्य दिल्लीतून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज, अमृतसरमधून गुरजित सिंह, जालंधरमधून चरणजित सिंह चन्नी, फतेहगढ साहिबमधून अमर सिंग, भंटिंडामधून जीत मोहिंदर सिंह सिद्धू,  संगरूरमधून सुखपाल सिंह खैरा, पटियालामधून धरमवीर गांधी आणि अलाहाबादमधून उज्ज्वल रेवती रमण सिंह या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.


या उमेदवारांना काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट


याआधी काँग्रेसनेही शनिवारी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. काँग्रेसने चंदीगडमधून मनीष तिवारी, गुजरातमधील मेहसाणामधून रामजी ठाकूर, अहमदाबाद पूर्वमधून हिम्मत सिंह पटेल, राजकोटमधून परेश भाई धनानी, नवसारीतून नैशध देसाई, हिमाचलमधील मंडीतून विक्रमादित्य सिंह, शिमलामधून विनोद सुलतानपुरी, ओदिशातील क्योंझारमधून मोहन हेबराम यांना उमेदवारी दिली आहे. बालासोरमधून श्रीकांत कुमार जीना, भद्रकमधून आनंद प्रसाद सेठी, जजपूरमधून आंचल दास, ढेंकनालमधून सस्मिता बेहरा, जगतसिंगपूरमधून रवींद्र कुमार सेठी, पुरीमधून सुचरिता मोहंती, भुवनेश्वरमधून यासिर नवाज यांना संधी देण्यात आली आहे.