पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे दरवर्षी न चुकता आपल्या पर्रा येथील मूळ घरातील गणपतीचे दर्शन घेतात. यंदा आजारपणामुळे त्यांना गणपती दर्शन घेणे शक्य होईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र सगळ्यांना चकित करत हॉस्पिटलमधून त्यांनी घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि परत हॉस्पिटल मध्ये दाखल झाले.


आज सायंकाळी 4 वाजता पर्रिकर यांनी कांदोळी येथून जवळच असलेल्या पर्रा येथील आपल्या मुळ घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.पर्रिकर जास्त वेळ घरी थांबले नाहीत. आल्या पावली ते लगेच हॉस्पिटल मध्ये परत आले.

पर्रिकर यांचा घरचा गणपती दीड दिवसाचा असतो. दरवर्षी ते दुसऱ्या दिवशी गणपतीचे दर्शन घेतात. सोवळे नेसून पूजा करतात आणि महाप्रसाद घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. यावेळी आजारपणामुळे त्यांना गणपती दर्शन घेणे शक्य होईल की नाही याबाबत साशंकता होती मात्र पर्रिकर यांनी ती खोटी ठरवत आपली गणेश भक्ती सगळ्याना दाखवून दिली आहे. पर्रिकर यांच्या आजारपणामुळे राजकीय वर्तुळात निर्माण झालेली विघ्ने दूर करण्यात गणराय त्यांना मदत करतात की नाही याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे.

कोअर टीमने हॉस्पिटलमध्ये घेतली पर्रिकर यांची भेट

राज्यात पर्रिकर यांच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज तातडीची कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी या कमिटीला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. भाजप आघाडी सरकारचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते कृषी मंत्री विजय सरदेसाई आणि मगो नेते तथा बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी देखील पर्रिकर यांची हॉस्पिटल मध्ये भेट घेतल्याने येत्या 2 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.