नवी दिल्ली: योगगुरु बाबा रामदेव यांनी समस्त देशवासियांना चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकस्तानला चीन साथ देत असल्याने, रामदेवबाबांनी हे आवाहन केलं आहे.
जैश ए महम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांतील ठरावाला चीनने विरोध केलाय. त्यापार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे.
याखेरीज अणूपुरवठादार गटात हिंदुस्थानला सदस्यत्व देण्यासही चीनने विरोध केला. त्यामुळे सोशल मीडियातून चीनच्या मालावर बहिष्कार घाला, असं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही करण्यात येतंय. त्यातच आता पतंजलीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवलेल्या रामदेव बाबांनीही चीनी वस्तुंना विरोध केला आहे.
"दिवाळीत चीनमधील विद्युत रोषणाई आणि डेकोरेशनच्या विविध वस्तूंनी देशातील बाजारपेठा ओसंडून वाहत असतात. इतकंच नाही तर आपल्या घरातील राम,कृष्ण, हनुमानाच्या मूर्तीही चीनी बनावटीच्या आहेत. त्यामुळे चीनच्या वस्तू खरेदी करणे म्हणजे एकप्रकारे दुष्मनाला मदत करण्यासारखं आहे" असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे.