Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बातमधून देशवासियांना संबोधित करणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 80वा भाग आहे. 


प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.


79व्या मन की बातच्या भागात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?


पंतप्रधान मोदींनी 79व्या मन की बातच्या भागाच्या सुरुवात टोकियो ऑलिम्पिकवरील चर्चेसोबत केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना पाहून केवळ मीच नाहीतर संपूर्ण देश रोमांचित झाला. दोन दिवसांपूर्वीचे काही अद्भुत फोटो, काही आठवणी आता माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे यंदा मी मन की बातची सुरुवात याच काही क्षणांनी करत आहे. 


त्यासोबतच पंतप्रधान मोदींनी 79व्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या ओडिशातील मजूर इसाक मुंडा जे सध्या युट्यूबर आहेत, त्यांचं कौतुक केलं होतं. मुंडा (35) ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील जुजुमुरा ब्लॉकच्या अंतर्गत बाबूपाली गावातील मजूर. आपल्या भूकेपासून लक्ष विचलित करण्यासाठी युट्यूब पाहणारा हा मजूर सध्या युट्यूब स्टार आहे. एककेळी पोटाची अबाळ होणारा हा मजूर युट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहे. 


2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'


पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 80 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. 27 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.